Sunday, 20 November 2011

प्रश्न.. इंग्रजी भाषेचा !

रामचंद्र गुहा ,रविवार, २० नोव्हेंबर २०११
ramchandraguha@yahoo.in
१९०५ आणि १९०६ मध्ये गांधीजी, त्यांच्या पत्नी कस्तुरबा आणि त्यांची मुले जोहान्सबर्गमध्ये हेन्री पोलाक आणि मिली पोलाक या दाम्पत्याबरोबर त्यांच्याच घरात राहात होते. हेन्री आणि मिली हे इंग्लिश दाम्पत्य होते. या दोन वर्षांच्या सहवासावर महात्माजींनी नंतर लिहिले होते- ‘मुलांना इंग्रजी शिक्षण देणे योग्य की अयोग्य यावर पोलाक आणि माझ्यात बऱ्याच वेळा वाद होत असे. जे भारतीय लोक आपल्या मुलांना लहानपणापासून इंग्रजी बोलायला, वाचायला, लिहायला लावतात ते आपल्या मुलांशी आणि राष्ट्राशी प्रतारणा करीत आहेत, आपल्या देशाच्या आध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक वारशापासून मुलांना वंचित ठेवत आहेत. पर्यायाने त्यांना राष्ट्रसेवेपासूनही वंचित ठेवत आहेत, असे माझे म्हणणे असे. म्हणूनच मी माझ्या मुलांशी सतत गुजरातीच बोलत असे आणि पोलाक दाम्पत्याला ते अजिबात रुचत नसे. मी माझ्या मुलांचे भविष्य घडविण्याऐवजी बिघडवत आहे असे त्यांना वाटत असे. मुलांना लहानपणापासूनच इंग्रजीसारख्या जागतिक भाषेचे शिक्षण दिले, तर आयुष्याच्या स्पर्धेत नुसते टिकून राहाणेच नव्हे; तर पुढे जाणे, प्रगती करणं त्यांना सहज शक्य होईल; असे पोलाकचे म्हणणे होते. त्याने ते मला पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मी मुलांना घरी गुजरातीच बोलण्याचा आग्रह धरला; तरी शाळेमध्ये आणि जोहान्सबर्गमध्ये इतरत्र वावरताना सतत इंग्रजी बोलणाऱ्यांशीच संपर्क आल्याने माझी मुले इंग्रजी बोलण्यात आणि लिहिण्यात आपसूकपणे पारंगत झाली. दक्षिण आफ्रिकेत प्रामुख्याने इंग्रजी भाषाच बोलली जात असे. बाहेर वावरताना इंग्रजी आणि घरात गुजराती यामुळे मुले द्वैभाषिक झाली ती अगदी सहजपणे! दोन्ही भाषा त्यांनी आत्मसात केल्या.’
गांधीजी आणि पोलाक यांच्यात ज्या मुद्यावरून वाद व्हायचा, त्याचे प्रतिध्वनी त्यानंतरही अनेक दशके उमटत राहिले. १९२० मध्ये गांधीजी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्यातही या मुद्यावरून वाद झाला. इंग्रजीच्या प्रेमापोटी वसाहतवाद्यांशी होणारी जवळीक ही अजाणतेपणी आपल्या संस्कृतीशी, विचारांशी प्रतारणा ठरेल काय? असा मुद्दा होता. तेव्हा हा धोका खरोखरच असल्याचे गांधीजींचे म्हणणे पडले, तर रवींद्रनाथ टागोर यांच्या मते, इंग्रजी आणि इतर भाषा आणि संस्कृतींमुळे निर्माण होणाऱ्या ज्ञानप्रकाशाचा भारतीयांना आपल्या भावी आयुष्यात निश्चितच फायदा होईल. स्वातंत्र्यानंतरच्या काळात स्वतंत्र विचारसरणीचे समाजवादी राम मनोहर लोहिया यांनी ‘अंग्रेजी हटाव’ आंदोलन सुरू केले. त्याचे नेतृत्त्व ते स्वत:च करीत होते. भारतातून इंग्रजी हद्दपार करण्यासाठीची ती चळवळ होती. इंग्लंडच्या राणीच्या भारत भेटीच्याच वेळी त्यांनी नेमके हे आंदोलन सुरू केल्याने त्यांनी आंदोलनासाठी निवडलेली वेळ चुकीची असल्याचे अनेकांना वाटले. लोहिया यांच्या आंदोलनाला तामिळी राजकीय नेते आणि विचारवंतांनी कडाडून विरोध केला. इंग्रजीची कास धरली नाही, तर देशाच्या दक्षिण, पश्चिम आणि पूर्वेकडील क्षेत्रावर हिंदी भाषिक लोक आपले वर्चस्व प्रस्थापित करतील अशी भीती या दक्षिणेतील राजकीय पुढाऱ्यांना आणि विचारवंतांना वाटत होती. राम मनोहर लोहिया यांच्याइतकेच स्वतंत्र विचारसरणीचे आणि तितकेच बुद्धिमान ई. व्ही. रामस्वामी ‘पेरियार’ यांच्या अनुयायांनी तामिळनाडूत हिंदीलाच विरोध केला. दरम्यान, रामस्वामी पेरियार यांचे एकेकाळचे विरोधक, प्रतिस्पर्धी चक्रवर्ती राजगोपालाचारी हेही हिंदीविरोधी आंदोलनात (अर्थातच इंग्रजीच्या प्रसारासाठीच्या आंदोलनात) सामील झाले. भारतातील विविध भाग, तसेच भारत आणि इतर देश यांच्यात संपर्काचे माध्यम म्हणून इंग्रजीच्या प्रसारावर भर देण्याचा या लोकांचा प्रयत्न होता. इंग्रजी ही विदेशी आणि साम्राज्यवाद्यांची भाषा आहे ,असा एक मतप्रवाह होता. त्यावर राजगोपालाचारी म्हणाले- ‘विद्येची देवता सरस्वती हिनेच सर्व भाषांना जन्म दिला असल्याने इंग्रजी ही सुद्धा आपलीच भाषा असल्याचा दावा आपण करू शकतो, आणि आपण तो करावाच.’
इंग्रजी भाषेबाबतचा हा वाद पुढेही सुरूच राहिला. कर्नाटकमध्ये कादंबरीकार यू. आर. अनंतमूर्ती आणि इतर अनेक बुद्धिमंतांनी, विचारवंतांनी सुद्धा मातृभाषेसाठीच आग्रह धरला. माध्यमिक शाळेत जाईपर्यंत तरी प्रत्येक बालकाला त्याच्या मातृभाषेतूनच शिक्षण देण्यात यावे, असे या मंडळीचे म्हणणे! (अनंतमूर्ती हे महात्मा गांधींचे विचार मानणारे, त्यांचा आदर करणारे आणि राम मनोहर लोहिया यांचे अनुयायी असूनही आपले स्वतंत्र विचार प्रभावीपणे मांडणारे म्हणून प्रसिद्ध आहेत.) तर दुसरीकडे दलित कार्यकर्त्यांचे म्हणणे असे, की कन्नड भाषेच्या प्रसाराचा आग्रह ही समाजाच्या उच्च स्तरातील, सवर्ण लोकांची खेळी आहे. दलितांना आधुनिक शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी ही मंडळी हे सर्व करीत आहेत. पूर्वीच्या काळी ब्राह्मण समाजाने दलितांना संस्कृत शिकू दिले नाही आता त्यांचेच वंशज आज दलितांना सत्तेच्या, अधिकाराच्या, प्रभावाच्या भाषेपासून म्हणजेच इंग्रजीपासून वंचित ठेवण्याचा खटाटोप करीत आहेत, असे दलित कार्यकर्त्यांंचे म्हणणे आहे.
नंतरच्या काळात इंग्रजी भाषेला समाजाच्या सर्व स्तरांमधून मिळालेली मान्यता, ही तिचे मान्य झालेले मोठेपण , तिची उपयुक्तता अधोरेखित करणारी आहे. उत्तरप्रदेशात लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रभान प्रसाद यांनी तर ‘इंग्रजी देवते’च्या नावाने एक मंदिर उभारण्याचे ठरविले. त्याची वॉल स्ट्रीट जर्नलने दखल घेतली. इंग्रजीचा सखोल अभ्यास करून, ती भाषा आत्मसात करून इतरांप्रमाणे समान हक्क प्राप्त करण्याची संधी दलितांना मिळविता येईल, असे चंद्रभान यांचे ठाम मत आहे.
एकशे सहा वर्षांपूर्वी गांधीजी आणि पोलाक यांच्यात ज्या विषयावरून जोहान्सबर्गमध्ये वाद होत असे, तो इंग्रजी भाषेबाबतचा वाद आज इतक्या वर्षांनंतरही सुरूच आहे. समाज आणि इतिहास जसा बदलत गेला, तसे या इंग्रजीविषयीच्या वादाचे स्वरूपही बदलत गेले. त्यात मुख्यत्त्वे तीन मुख्य बदल झालेले दिसतात. पहिली गोष्ट म्हणजे अलीकडच्या काळात आंतरजातीय विवाहाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रूंमध्ये तर ते अधिक दिसते. एखाद्या गुजराती तरुणाने तामिळी मुलीशी विवाह केला, किंवा बंगाली तरुणीने मल्याळी युवकाशी लग्न केले, तर त्यांच्या मुलांची भाषा ही इंग्रजीच राहाते असे आढळून आले आहे. किंबहुना त्या कुटुंबाचीच ती भाषा होऊन बसते. ब्रिटननंतर आज अमेरिका ही जागतिक महासत्ता म्हणून पुढे आलेली असली, तरी निरनिराळ्या देशांमधील लोकांची परस्पर संपर्काची भाषा ही इंग्रजीच राहिल्याने तिचे महत्त्व वाढले आहे. मग वेगवेगळ्या देशांमधील लोकांची इंग्रजी बोलण्याची लकब (स्टाईल) ही वेगवेगळी असू शकेल; पण शेवटी इंग्रजी ही जागतिक भाषा म्हणून मान्यता पावल्याचे दिसून येते.
तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे किमान भारतात तरी गरीब आणि तळागाळातील लोकांमध्ये आज इंग्रजीबद्दलचा ध्यास कमालीचा वाढला आहे. इंग्रजी भाषा शिकायलाच हवी, असे त्या वर्गाला मनापासून वाटू लागले आहे. आपल्याकडे घरगडी म्हणून काम करणारा माणूस किंवा मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या स्त्रियांना, आपल्या मुलांनी हेच काम करावे, असे अजिबात वाटत नाही. आपले परंपरागत काम आपल्या मुलांनी करू नये, उलट सर्व क्षेत्रात चांगल्या नोकऱ्यांची संधी मिळवून देणारी इंग्रजी भाषा शिकून आपल्या मुलांनी उन्नतीचा मार्ग धरावा, असे त्यांना वाटते. गरीब मुस्लिम बांधव, दलित बांधव, आदिवासी बांधव या सर्वानीच आता इंग्रजी शिकण्याचा आणि आपल्या मुलांनाही ती भाषा शिकविण्याचा ध्यास घेतला आहे, आणि आता ही ऊर्मी कोणीही थोपवू शकत नाही. कोणी मान्य करो वा न करो, मला तरी असे वाटते आहे. राम मनोहर लोहिया आणि त्यांच्या अनुयायांचा इंग्रजी विरोधातील लढा अयशस्वी झाला आहे. आपला देश हा भाषिक आणि साहित्यिक परंपरांच्या बाबतीत प्रचंड विविधता असलेला देश आहे आणि तरीही प्रत्यक्षात आपल्या स्वत:च्या भाषेच्या प्रेमापोटी इतर भाषांचा विचार न करता आपल्या भाषेचा आग्रह धरण्याचा मोह आपल्याला कां होतो? अनेक मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू, प्रतिष्ठित लोक फक्त इंग्रजी बोलतात, ही जर शरमेची आणि खेदाची बाब असेल, तर समाजाच्या निम्नस्तरातील तसेच, कामगार वर्गातील लोकांना इंग्रजीतील चांगले शिक्षण मिळू शकत नाही, हीसुद्धा तितकीच शरमेची गोष्ट आहे.
गांधीजींनी आपल्या मुलांना गुजराती शिकण्याचा आग्रह धरला, तरीही जोहान्सबर्गमधील एकूण वातावरणाने त्यांची मुले आपोआप तेथील इंग्रजी ही मुख्य भाषा शिकली, केवळ जोहान्सबर्गच नव्हे, तर इंग्रजी ही दैववशात जगाची भाषा ठरली ही गोष्ट नजरेआड करून चालणार नाही.
भारतीय लोक वर्ग आणि भाषांच्या वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये राहात असल्यामुळे द्वैभाषिक तसेच बहुभाषिक होणे आपल्याकडे तसे कठीणच आहे. द्वैभाषिकता, बहुभाषिकतेच्या प्रसाराला चालना मिळणे खरोखरच दुरापास्त आहे. भारतातील उच्च वर्गातील एखाद्या बालकाला हिंदी, मराठी, कानडी किंवा इतर कोणत्याही भारतीय भाषेतील थोडेसे वाक्प्रचार आणि कामापुरती ती भाषा आत्मसात करणे सहज शक्य आहे, सुलभ आहे. त्याच बरोबर त्या भाषेतील चांगल्या दर्जाचे साहित्य वाचण्याची, ते समजण्याची क्षमता त्याच्या ठायी आली, तर ते किती चांगले होईल! समाजाच्या निम्नस्तरातील मुलांना पैशाअभावी इंग्रजीचे पर्याप्त शिक्षण, ज्ञान मिळू शकत नाही. विशेषत: आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटक, कामगार वर्गातील लोकांची मुले यांची ही मोठी समस्या आहे.
गांधीजी हे कितीही थोर असले, तरी एक आदर्श पिता म्हणून त्यांच्याकडे पाहता येणार नाही. अपघाताने म्हणा, वा परिस्थितीवश म्हणा, त्यांची मुले ही इतर भारतीयांपेक्षा किमान इंग्रजी शिक्षणाच्या बाबतीत का होईना , सुदैवी ठरली, असे म्हणावे लागेल. गुजराती भाषेबरोबरच इंग्रजीचेही शिक्षण मिळाल्याने ती स्वाभाविकपणे द्वैभाषिक होऊ शकली.
सांप्रत भारतात मात्र खऱ्या अर्थाने द्वैभाषिकत्त्व किंवा बहुभाषिकत्त्व प्राप्त करणे ही गोष्ट बहुतांश भारतीय नागरिकांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट होऊन बसलेली आहे..!
अनुवाद : अनिल पं. कुळकर्णी

No comments:

Post a Comment