Sunday, 20 November 2011

प्रश्न.. इंग्रजी भाषेचा !

रामचंद्र गुहा ,रविवार, २० नोव्हेंबर २०११
ramchandraguha@yahoo.in
१९०५ आणि १९०६ मध्ये गांधीजी, त्यांच्या पत्नी कस्तुरबा आणि त्यांची मुले जोहान्सबर्गमध्ये हेन्री पोलाक आणि मिली पोलाक या दाम्पत्याबरोबर त्यांच्याच घरात राहात होते. हेन्री आणि मिली हे इंग्लिश दाम्पत्य होते. या दोन वर्षांच्या सहवासावर महात्माजींनी नंतर लिहिले होते- ‘मुलांना इंग्रजी शिक्षण देणे योग्य की अयोग्य यावर पोलाक आणि माझ्यात बऱ्याच वेळा वाद होत असे. जे भारतीय लोक आपल्या मुलांना लहानपणापासून इंग्रजी बोलायला, वाचायला, लिहायला लावतात ते आपल्या मुलांशी आणि राष्ट्राशी प्रतारणा करीत आहेत, आपल्या देशाच्या आध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक वारशापासून मुलांना वंचित ठेवत आहेत. पर्यायाने त्यांना राष्ट्रसेवेपासूनही वंचित ठेवत आहेत, असे माझे म्हणणे असे. म्हणूनच मी माझ्या मुलांशी सतत गुजरातीच बोलत असे आणि पोलाक दाम्पत्याला ते अजिबात रुचत नसे. मी माझ्या मुलांचे भविष्य घडविण्याऐवजी बिघडवत आहे असे त्यांना वाटत असे. मुलांना लहानपणापासूनच इंग्रजीसारख्या जागतिक भाषेचे शिक्षण दिले, तर आयुष्याच्या स्पर्धेत नुसते टिकून राहाणेच नव्हे; तर पुढे जाणे, प्रगती करणं त्यांना सहज शक्य होईल; असे पोलाकचे म्हणणे होते. त्याने ते मला पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मी मुलांना घरी गुजरातीच बोलण्याचा आग्रह धरला; तरी शाळेमध्ये आणि जोहान्सबर्गमध्ये इतरत्र वावरताना सतत इंग्रजी बोलणाऱ्यांशीच संपर्क आल्याने माझी मुले इंग्रजी बोलण्यात आणि लिहिण्यात आपसूकपणे पारंगत झाली. दक्षिण आफ्रिकेत प्रामुख्याने इंग्रजी भाषाच बोलली जात असे. बाहेर वावरताना इंग्रजी आणि घरात गुजराती यामुळे मुले द्वैभाषिक झाली ती अगदी सहजपणे! दोन्ही भाषा त्यांनी आत्मसात केल्या.’
गांधीजी आणि पोलाक यांच्यात ज्या मुद्यावरून वाद व्हायचा, त्याचे प्रतिध्वनी त्यानंतरही अनेक दशके उमटत राहिले. १९२० मध्ये गांधीजी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्यातही या मुद्यावरून वाद झाला. इंग्रजीच्या प्रेमापोटी वसाहतवाद्यांशी होणारी जवळीक ही अजाणतेपणी आपल्या संस्कृतीशी, विचारांशी प्रतारणा ठरेल काय? असा मुद्दा होता. तेव्हा हा धोका खरोखरच असल्याचे गांधीजींचे म्हणणे पडले, तर रवींद्रनाथ टागोर यांच्या मते, इंग्रजी आणि इतर भाषा आणि संस्कृतींमुळे निर्माण होणाऱ्या ज्ञानप्रकाशाचा भारतीयांना आपल्या भावी आयुष्यात निश्चितच फायदा होईल. स्वातंत्र्यानंतरच्या काळात स्वतंत्र विचारसरणीचे समाजवादी राम मनोहर लोहिया यांनी ‘अंग्रेजी हटाव’ आंदोलन सुरू केले. त्याचे नेतृत्त्व ते स्वत:च करीत होते. भारतातून इंग्रजी हद्दपार करण्यासाठीची ती चळवळ होती. इंग्लंडच्या राणीच्या भारत भेटीच्याच वेळी त्यांनी नेमके हे आंदोलन सुरू केल्याने त्यांनी आंदोलनासाठी निवडलेली वेळ चुकीची असल्याचे अनेकांना वाटले. लोहिया यांच्या आंदोलनाला तामिळी राजकीय नेते आणि विचारवंतांनी कडाडून विरोध केला. इंग्रजीची कास धरली नाही, तर देशाच्या दक्षिण, पश्चिम आणि पूर्वेकडील क्षेत्रावर हिंदी भाषिक लोक आपले वर्चस्व प्रस्थापित करतील अशी भीती या दक्षिणेतील राजकीय पुढाऱ्यांना आणि विचारवंतांना वाटत होती. राम मनोहर लोहिया यांच्याइतकेच स्वतंत्र विचारसरणीचे आणि तितकेच बुद्धिमान ई. व्ही. रामस्वामी ‘पेरियार’ यांच्या अनुयायांनी तामिळनाडूत हिंदीलाच विरोध केला. दरम्यान, रामस्वामी पेरियार यांचे एकेकाळचे विरोधक, प्रतिस्पर्धी चक्रवर्ती राजगोपालाचारी हेही हिंदीविरोधी आंदोलनात (अर्थातच इंग्रजीच्या प्रसारासाठीच्या आंदोलनात) सामील झाले. भारतातील विविध भाग, तसेच भारत आणि इतर देश यांच्यात संपर्काचे माध्यम म्हणून इंग्रजीच्या प्रसारावर भर देण्याचा या लोकांचा प्रयत्न होता. इंग्रजी ही विदेशी आणि साम्राज्यवाद्यांची भाषा आहे ,असा एक मतप्रवाह होता. त्यावर राजगोपालाचारी म्हणाले- ‘विद्येची देवता सरस्वती हिनेच सर्व भाषांना जन्म दिला असल्याने इंग्रजी ही सुद्धा आपलीच भाषा असल्याचा दावा आपण करू शकतो, आणि आपण तो करावाच.’
इंग्रजी भाषेबाबतचा हा वाद पुढेही सुरूच राहिला. कर्नाटकमध्ये कादंबरीकार यू. आर. अनंतमूर्ती आणि इतर अनेक बुद्धिमंतांनी, विचारवंतांनी सुद्धा मातृभाषेसाठीच आग्रह धरला. माध्यमिक शाळेत जाईपर्यंत तरी प्रत्येक बालकाला त्याच्या मातृभाषेतूनच शिक्षण देण्यात यावे, असे या मंडळीचे म्हणणे! (अनंतमूर्ती हे महात्मा गांधींचे विचार मानणारे, त्यांचा आदर करणारे आणि राम मनोहर लोहिया यांचे अनुयायी असूनही आपले स्वतंत्र विचार प्रभावीपणे मांडणारे म्हणून प्रसिद्ध आहेत.) तर दुसरीकडे दलित कार्यकर्त्यांचे म्हणणे असे, की कन्नड भाषेच्या प्रसाराचा आग्रह ही समाजाच्या उच्च स्तरातील, सवर्ण लोकांची खेळी आहे. दलितांना आधुनिक शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी ही मंडळी हे सर्व करीत आहेत. पूर्वीच्या काळी ब्राह्मण समाजाने दलितांना संस्कृत शिकू दिले नाही आता त्यांचेच वंशज आज दलितांना सत्तेच्या, अधिकाराच्या, प्रभावाच्या भाषेपासून म्हणजेच इंग्रजीपासून वंचित ठेवण्याचा खटाटोप करीत आहेत, असे दलित कार्यकर्त्यांंचे म्हणणे आहे.
नंतरच्या काळात इंग्रजी भाषेला समाजाच्या सर्व स्तरांमधून मिळालेली मान्यता, ही तिचे मान्य झालेले मोठेपण , तिची उपयुक्तता अधोरेखित करणारी आहे. उत्तरप्रदेशात लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रभान प्रसाद यांनी तर ‘इंग्रजी देवते’च्या नावाने एक मंदिर उभारण्याचे ठरविले. त्याची वॉल स्ट्रीट जर्नलने दखल घेतली. इंग्रजीचा सखोल अभ्यास करून, ती भाषा आत्मसात करून इतरांप्रमाणे समान हक्क प्राप्त करण्याची संधी दलितांना मिळविता येईल, असे चंद्रभान यांचे ठाम मत आहे.
एकशे सहा वर्षांपूर्वी गांधीजी आणि पोलाक यांच्यात ज्या विषयावरून जोहान्सबर्गमध्ये वाद होत असे, तो इंग्रजी भाषेबाबतचा वाद आज इतक्या वर्षांनंतरही सुरूच आहे. समाज आणि इतिहास जसा बदलत गेला, तसे या इंग्रजीविषयीच्या वादाचे स्वरूपही बदलत गेले. त्यात मुख्यत्त्वे तीन मुख्य बदल झालेले दिसतात. पहिली गोष्ट म्हणजे अलीकडच्या काळात आंतरजातीय विवाहाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रूंमध्ये तर ते अधिक दिसते. एखाद्या गुजराती तरुणाने तामिळी मुलीशी विवाह केला, किंवा बंगाली तरुणीने मल्याळी युवकाशी लग्न केले, तर त्यांच्या मुलांची भाषा ही इंग्रजीच राहाते असे आढळून आले आहे. किंबहुना त्या कुटुंबाचीच ती भाषा होऊन बसते. ब्रिटननंतर आज अमेरिका ही जागतिक महासत्ता म्हणून पुढे आलेली असली, तरी निरनिराळ्या देशांमधील लोकांची परस्पर संपर्काची भाषा ही इंग्रजीच राहिल्याने तिचे महत्त्व वाढले आहे. मग वेगवेगळ्या देशांमधील लोकांची इंग्रजी बोलण्याची लकब (स्टाईल) ही वेगवेगळी असू शकेल; पण शेवटी इंग्रजी ही जागतिक भाषा म्हणून मान्यता पावल्याचे दिसून येते.
तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे किमान भारतात तरी गरीब आणि तळागाळातील लोकांमध्ये आज इंग्रजीबद्दलचा ध्यास कमालीचा वाढला आहे. इंग्रजी भाषा शिकायलाच हवी, असे त्या वर्गाला मनापासून वाटू लागले आहे. आपल्याकडे घरगडी म्हणून काम करणारा माणूस किंवा मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या स्त्रियांना, आपल्या मुलांनी हेच काम करावे, असे अजिबात वाटत नाही. आपले परंपरागत काम आपल्या मुलांनी करू नये, उलट सर्व क्षेत्रात चांगल्या नोकऱ्यांची संधी मिळवून देणारी इंग्रजी भाषा शिकून आपल्या मुलांनी उन्नतीचा मार्ग धरावा, असे त्यांना वाटते. गरीब मुस्लिम बांधव, दलित बांधव, आदिवासी बांधव या सर्वानीच आता इंग्रजी शिकण्याचा आणि आपल्या मुलांनाही ती भाषा शिकविण्याचा ध्यास घेतला आहे, आणि आता ही ऊर्मी कोणीही थोपवू शकत नाही. कोणी मान्य करो वा न करो, मला तरी असे वाटते आहे. राम मनोहर लोहिया आणि त्यांच्या अनुयायांचा इंग्रजी विरोधातील लढा अयशस्वी झाला आहे. आपला देश हा भाषिक आणि साहित्यिक परंपरांच्या बाबतीत प्रचंड विविधता असलेला देश आहे आणि तरीही प्रत्यक्षात आपल्या स्वत:च्या भाषेच्या प्रेमापोटी इतर भाषांचा विचार न करता आपल्या भाषेचा आग्रह धरण्याचा मोह आपल्याला कां होतो? अनेक मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू, प्रतिष्ठित लोक फक्त इंग्रजी बोलतात, ही जर शरमेची आणि खेदाची बाब असेल, तर समाजाच्या निम्नस्तरातील तसेच, कामगार वर्गातील लोकांना इंग्रजीतील चांगले शिक्षण मिळू शकत नाही, हीसुद्धा तितकीच शरमेची गोष्ट आहे.
गांधीजींनी आपल्या मुलांना गुजराती शिकण्याचा आग्रह धरला, तरीही जोहान्सबर्गमधील एकूण वातावरणाने त्यांची मुले आपोआप तेथील इंग्रजी ही मुख्य भाषा शिकली, केवळ जोहान्सबर्गच नव्हे, तर इंग्रजी ही दैववशात जगाची भाषा ठरली ही गोष्ट नजरेआड करून चालणार नाही.
भारतीय लोक वर्ग आणि भाषांच्या वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये राहात असल्यामुळे द्वैभाषिक तसेच बहुभाषिक होणे आपल्याकडे तसे कठीणच आहे. द्वैभाषिकता, बहुभाषिकतेच्या प्रसाराला चालना मिळणे खरोखरच दुरापास्त आहे. भारतातील उच्च वर्गातील एखाद्या बालकाला हिंदी, मराठी, कानडी किंवा इतर कोणत्याही भारतीय भाषेतील थोडेसे वाक्प्रचार आणि कामापुरती ती भाषा आत्मसात करणे सहज शक्य आहे, सुलभ आहे. त्याच बरोबर त्या भाषेतील चांगल्या दर्जाचे साहित्य वाचण्याची, ते समजण्याची क्षमता त्याच्या ठायी आली, तर ते किती चांगले होईल! समाजाच्या निम्नस्तरातील मुलांना पैशाअभावी इंग्रजीचे पर्याप्त शिक्षण, ज्ञान मिळू शकत नाही. विशेषत: आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटक, कामगार वर्गातील लोकांची मुले यांची ही मोठी समस्या आहे.
गांधीजी हे कितीही थोर असले, तरी एक आदर्श पिता म्हणून त्यांच्याकडे पाहता येणार नाही. अपघाताने म्हणा, वा परिस्थितीवश म्हणा, त्यांची मुले ही इतर भारतीयांपेक्षा किमान इंग्रजी शिक्षणाच्या बाबतीत का होईना , सुदैवी ठरली, असे म्हणावे लागेल. गुजराती भाषेबरोबरच इंग्रजीचेही शिक्षण मिळाल्याने ती स्वाभाविकपणे द्वैभाषिक होऊ शकली.
सांप्रत भारतात मात्र खऱ्या अर्थाने द्वैभाषिकत्त्व किंवा बहुभाषिकत्त्व प्राप्त करणे ही गोष्ट बहुतांश भारतीय नागरिकांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट होऊन बसलेली आहे..!
अनुवाद : अनिल पं. कुळकर्णी

Saturday, 19 November 2011

एका मैत्रिणीची अपूर्वाई! (प्रवीण दवणे)

एका मैत्रिणीची अपूर्वाई! (प्रवीण दवणे)
प्रवीण दवणे dilkhulass@rediffmail.com
"परीक्षांमधील "व्हीव्हीआयएमपी' कळणाऱ्या किंवा शोधणाऱ्या मुलांना आयुष्यात काय, कोणत्या वयात, तेच का इंपॉर्टन्ट आहे ते कधी कळणार?''.... एका गोड शहाण्या मुलीचा हा सवाल लेखकाला नव्हता, तर साऱ्या तरुणाईला होता. तिला समजवण्यासाठी मनातला प्राध्यापक सज्ज होता; पण तिनंच त्यांचा क्‍लास घेतला. अर्थात, हा "क्‍लास' त्यांना सुखावणारा आणि आश्‍वस्त करणारा होता...

एक अगदी शहाणी मुलगी माझ्यासमोर चमकदार डोळ्यांनी बोलत होती न्‌ तिच्या बोलण्यातही चमकदार दृष्टी होती. वय नुकतंच अठरा पूर्ण झालेलं असेल न्‌ विषय होता तिच्यावर लुब्ध झालेल्या एका तेवढ्याच निरागस प्रेमाबद्दलचा! सगळंच गोड! माझ्या पिढीच्या दृष्टीनं थोडं गमतीदार; पण तिच्या दृष्टीनं खूपच गंभीर! मध्येच मी तिला उगीचच थोडं डिवचण्यासाठी प्रश्‍नाचं निमित्त करायचो.

"अगं पण तू त्याला खरंच आवडतेस.''
""आवडू दे की! मी कुणाला आवडणं ह्यात काहीच गैर नाही. तशा पुष्कळ गोष्टी आपल्याला आवडतात. उदाहरणार्थ आपल्याला ताजमहाल आवडतो, वेरूळचं कैलास लेणंही आवडतं; पण म्हणून काही ते आपण घरी घेऊन जात नाही. मनापासून त्याचा आनंद घेतो आणि पुढे जातो. मला हेच कळत नाही, विस्मित एक गुणी मुलगा आहे; पण तेवढी एकच गोष्ट त्याच्याजवळ आहे. त्यानं आत्ता खरं तर माझा विचार करीत राहण्यापेक्षा स्वतःच्या करिअरचा विचार केला तर तो विचारच त्याला पुढे नेईल. त्याचं काय आहे, आवडणं न्‌ गुंतून पडणं, यातच त्याचा घोटाळा झालाय!''
कळूनही न कळल्याचा आव आणत मी म्हटलं, ""म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला अपूर्वा?''
""अहो, विस्मित मृगजळाच्या मागे लागलाय. मी त्याला आवडलेय हे मला माहितेय आणि खरं सांगू?''
""हं?''
""तोही मला आवडलाय!''
मी जरा गडबडले... नाजूक फ्रेमच्या नितळ चष्म्याआडचे तिचे डोळे हसरे चकाकले.
""खरंच, तो कुणालाही आवडावा असाच आहे. आमच्या ग्रुपमध्ये सर्वांत अबोल आणि तरीही बोलका, अगदी समंजस मुलगा आहे तो! आम्ही सगळे जेव्हा-जेव्हा भेटलो तेव्हा-तेव्हा त्यानं मलाच नाही, प्रत्येक मुलीला जो रिस्पेक्‍ट दिला ना तो ग्रेटच! इतर मुलांना कुठली-कुठली व्यसनं आहेत, त्यांची भाषाही अशीतशीच आहे, पण विस्मित! ओह्‌ ही इज नोबेल पर्सन!''
""अगं मग?''

""पण म्हणून मी त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देऊन तो माझा नवरा व्हावा असं मला वाटेल असं तुम्ही कसं म्हणू शकता? आणि त्यानं तरी का तसं समजावं? वर्गातला - कॉलेजातला एखादा मुलगा मुलीला आवडू शकतो; पण जन्माचा साथीदार निवडताना मी फक्त त्याचा स्वभाव किंवा त्याला मी किती आवडते याचाच विचार नाही करणार! मीच कशाला- रादर कुठलीच मुलगी नाही करत. प्रत्येक मुलगी निदान मी तरी हाच विचार करते- हा मुलगा आणखी दहा वर्षांनी आयुष्यात कितपत - कुठं सेटल होईल. आज त्याच्याशी चॅटिंग केलं, पण पुढे हे प्रेम तो निभावू शकेल? जो एज्युकेशनल कोर्स आम्ही निवडलाय त्यात तो फर्स्ट ग्रेड मिळवून त्याला इंटरनॅशनल कंपनीचं हॅण्डसम पॅकेज तो मिळवू शकेल? आज माझ्या पप्पा-मम्मीनं मला ज्या सुखात ठेवलंय, ते सुख हा मुलगा मला आयुष्यभर देऊ शकेल? याचं उत्तर "नकारार्थी' आलं तर नुसतं एकमेकाला आवडत राहून आत्ताची करिअरची इयर्स स्पॉइल कशाला करायची? मी नाही, माझ्या ग्रुपमधली प्रत्येक मुलगी हाच विचार करते आणि तो करायलाच हवा. अरे, मी म्हणते, आवडली ना एखादी मुलगी, मग तिच्यावर प्रेम करीत ए.टी.के.टी. लावून घेण्यापेक्षा युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल अचीव्ह करून दाखवा नं तिला! काय हिंमत आहे, मग कोण आड येईल? तिच्या घरातलेही विरोध करताना शंभरदा विचार करतील!''

आता "विस्मित' व्हायची "टर्न' माझी होती! ती मलाही आवडू लागली होती. त्या आवडण्यात स्वतःच्या मुलीबद्दल वाटावा असा आदर होता. एक अठरा वर्षांची मुलगी जगण्यातील वाटा-आडवाटांचा एवढा विचार करते, हे सत्यच थक्क करणारं होतं.

""अपूर्वा, मी विस्मितलाही दोन-तीन वर्षं ओळखतो. त्याचे बाबा माझ्याच कॉलेजात प्राध्यापक आहेत. घरातलं वातावरण सुसंस्कृत आहे. विस्मितही कधी थिल्लर वागलाय हे मी पाहिलेलं नाही. आज तो गोंधळलाय. तू म्हणतेस त्याप्रमाणं मृगजळात गुंतलाय. या साऱ्या नादात त्याच्या अभ्यासावर परिणाम होतोय, असंही त्याचे वडील काळजीनं बोलत होते. आज- या क्षणी सर्वच ओ.के. वाटतंय; पण त्याची ही एकतर्फी अधीरता अशीच सुरू राहिली, तर मात्र ऑपरेशननंही बरा न होणारा आजार होईल. अपूर्वा बेटा, खरं सांगू, तूच त्याला विश्‍वासानं का नाही सांगत? त्याचं काय, तू सजग आहेस, त्याची कंपनी तू एन्जॉयही करतेयस. पुन्हा करिअर, लाईफ याबद्दल पुरेसा अवेअरनेस तुझ्यात आहे गं; पण त्याच्यात तो अगदी नाही. असं नको व्हायला, तू त्याला खेळवतेयस. त्याचं व्याकूळ होणं, इमोशनल होणं, काही वेळा त्याचं अश्रू गाळणं एन्जॉय करतेयस आणि बेसावध असलेल्या त्याचं तू अगदी मजेनं नुकसान करतेयस! ह्यानं होईल काय, कॉलेजची ही वर्षं तू त्याची "बॉयफ्रेंड' म्हणून कंपनीही एन्जॉय करशील, त्याचं पुरेसं नुकसानही करशील आणि पुढे लास्ट इयरला भरपूर पर्सेंटेजचं पॅकेज घेऊन पंधरा-वीस लाखांच्या पोस्टवर नोकरीही मिळवशील; पण मग आता निष्पाप, मूर्खपणानं का होईना तुझ्यावर जीव लावणाऱ्या या विस्मितचं काय करायचं? तूच त्याला सावरायला हवं. नाही तर एक हुशार अभिनेत्री ठरशील तू!''

त्या बुद्धिमान "करिअर ओरिएन्टेड' जगणाऱ्या आजच्या "प्रॅक्‍टिकल' प्रतिनिधीचे डोळे चमकले. माझ्या बोलण्यातली काळजी, तळमळ तिला समजलीच; पण अगदी नकळत तिच्या वागण्यातून जाणारे चुकीचे संकेतसुद्धा तिला समजले. स्वरात एक विनम्र नरमाई आणून अपूर्वा म्हणाली,

""हं, मीही जरा बदलायला हवं हे खरंय! माझ्या मोकळं बोलण्याचा, त्याच्या एसएमएसना उत्तर देण्याचा आणि ऑफ पिरियडला कॅंटिनमध्ये कॉफी घेण्याचा अर्थ मीही त्याच्यावर त्याच्या मनात आहे तसं प्रेम करते असं तो घेत असेल, तर तर मीही बदलायला हवं! हे आत्तापर्यंत मी लक्षातच घेतलं नव्हतं, की मी त्याच्या इनोसन्सचा फायदा घेऊन त्याला खेळवतेय असाही अर्थ निघू शकतो. रादर, तसा निघतोच आहे, हे मात्र मी इमॅजिनच केलं नव्हतं. मी त्याला न दुखावता मलाही बदलेन सर!''

स्वरातली आर्तता निःस्तब्धतेत विरघळली होती. काही क्षण थांबून ती म्हणाली,
""एक सांगू?''
""हं!''
""एकदा नाही अनेकदा त्याला मी विचारलंय, कधी तर कुठलाच हक्क नसताना खडसावलंय!''
""काय?''
""त्याला समजावलंय - अरे स्मित, मुलाचं अठरा वय न्‌ मुलीचं अठरा वय यात खूप फरक असतो. अगदी आजही तो डिफरन्स आहे. आत्ता दोन-चार वर्षांत माझ्या घरात माझ्या लग्नाची बोलणी सुरू होतील. तेव्हा वयाच्या एकवीस-बाविसाव्या वर्षी तुझ्या हातात काय असेल? एक डिग्री, बस्स! फक्त डिग्रीवर पोट भरतं का? तू आत्ता फक्त करिअरवरच प्रेम कर! तेच तुला उपयोगी येईल. एकदा का तू व्यवसाय, पैसा, घर असं सेटल झालास, की वेळच्या वेळी त्या-त्या गोष्टी होणारच आहेत; त्या आत्तापासून सुरू करून तुझ्या हाती फ्रस्ट्रेशनशिवाय काहीही येणार नाहीये. एकदा तर तो हवेतून जमिनीवर यावा म्हणून मुद्दामच म्हणाले, ""माझे पपा गावातले ग्रेट इंटिरिअर डेकोरेटर आहेत. त्यांनी मला संपूर्ण सुखात जे-जे हवंय ते-ते देऊन वाढवलंय. मी मागायची खोटी, की ती वस्तू समोर हजर. हं, आता सांग मला आत्ता पंधरा हजारांचा ड्रेस हवाय, देऊ शकतोयस तू? अरे, आत्ता तुझ्या खिशात तुझ्या बाबांनी दिलेल्या पॉकेटमनीशिवाय काहीही नाही रे! विस्मित, आपण मिडल क्‍लास लोक फार तर हायर मिडल क्‍लास! आपल्या आई-बाबांनी जे कमावलंय ते कष्टांनी आणि तेही त्यांच्या जन्माला पुरेल इतकंच. आपल्या आयुष्याची कमाई आपण करायला हवी. पुढाऱ्यांच्या मुलांना कोट्यवधीची इस्टेट असते. आपल्या बाबांची - आईची इस्टेट "आपण', "आपलं कर्तृत्व', "आपलं करिअर' ही आहे रे! ते मिळव!''

माझ्या डोळ्यांत अगदी नकळत पाणी भरून आलं. त्यात त्या अगदी शहाण्या मुलीबद्दलचं कौतुक दाटलं होतं. पण त्याकडे सहज अलक्ष करीत अपूर्वा खळखळून निर्व्याज हसून म्हणाली, ""एकदा तर मी त्याला मजेनं दमच भरला. थांब! राखीच बांधते तुला म्हणजे ताळ्यावर येशील!''

आता माझ्या चार मजली इमारतीवर सात मजली हास्य उभे राहिले होते. पुन्हा लगेच गंभीर होत ती गोड मुलगी म्हणाली,
""माझ्यासमोर मी बघतेय - कॉलेजात, सोसायटीत, सिटीत, क्‍लासमध्ये कुठच्या वेळी काय इंपॉर्टंट ते न कळलेले कित्ती जण आयुष्याचं नुकसान करतात. सर, एक्‍झॅममधलं "व्ही.व्ही.आय.एम.पी.' यांना काढता येतं; पण याच वयात आयुष्यात आत्ताचं व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट यांना कळलं तर!''
""तर!''

मी एक निःश्‍वास टाकला. चार तासांपूर्वी अनोळखी असणाऱ्या मुलीबद्दलच्या अपार कौतुकानं मी ओथंबलो होतो. नमस्कार करून ते गोड मन निघून गेलं. काही मिनिटं मी फक्त डोळे मिटून, अगदी कोवळ्या पिढीतील त्या समंजस मनाबद्दल विचार करीत राहिलो. मग ठरवून फोनजवळ गेलो. माझ्याच फोनची वाट पाहणाऱ्या विस्मितच्या बाबांना फोन लावला. एवढंच म्हणालो,

""प्रधानसर, निश्‍चिंत राहा! विस्मित एका अगदी योग्य, सुजाण मैत्रीच्या सावलीत सुखरूप आहे! आपण समजतो त्याहून ही पिढी जागृत आहे. तुम्ही किंवा मी विस्मितला काही समजावण्यापेक्षा एका मैत्रिणीची अपूर्वाईच त्याला भानावर आणते आहे!''

खरं तर जिला समजवण्यासाठी माझ्यातला प्राध्यापक सज्ज होता, आज तिनंच माझा "क्‍लास' घेतला होता! असा वर्ग खूप वर्षांनी अनुभवला होता!
जुने जाऊ द्या मरणालागुनी (उत्तम कांबळे)
उत्तम कांबळे uttam.kamble@esakal.com
"साहेब आमच्याकडं लग्न झालेल्या बाईच्या हातचा स्वयंपाक फक्त तिचा नवरा आणि तिची पोरंच खातात. सासू-सासरे, दीर आदी नातेवाईक तो खात नाहीत. आपण भ्रष्ट झालो, असं त्यांना वाटतं. चुकून विवाहित बाई पाणी किंवा पाण्याचा पाइप जरी ओलांडून गेली तरी ते पाणी बाटतं... इतर लोक ते पिणार नाहीत. एवढंच काय, लगीन झालेल्या बाईचे कपडे स्वतंत्रपणे ठेवावे लागतात. आमच्या पारध्यांच्या वस्तीत बायकांच्या साड्या घरावर वाळताना कधीच दिसणार नाहीत. त्या बाईचा हात कुठंच लागू दिला जात नाही... आता हे सारं कधी आणि कसं सुरू झालं ठाऊक नाही; पण काही ठिकाणी ते टिकून आहे अजून... हे सारं संपावं म्हणून आम्ही खूप प्रयत्न करतोय.. म्हणावं तेवढं यश येत नाही अजून...''

भास्कर भोसले प्रत्यक्ष भेटला ते ठाणे येथे झालेल्या 84 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात. तो स्वतः पारधी, अल्पशिक्षित, उरुळी कांचन येथे एका शिक्षणसंस्थेत शिपायाची नोकरी करणारा आणि पारध्याच्या जीवनावर "दैना' नावाची कादंबरी लिहून नावारूपाला आलेला... या कादंबरीच्या सोळाव्या आवृत्तीचं प्रकाशन मी ठाण्यात केलं होतं... कादंबरीची विक्री त्याचा भाऊ नामदेव गावोगाव फिरून करतोय... एक दिवस भास्करचा फोन आला. रविवारी (23 ऑक्‍टोबर 2011) नाशिकला येतोय... भेटू या... दुपारी तो, त्याची पत्नी आणि काही मित्रांसह आला. खूप भरभरून बोलत होता... पारधी समाजाची अशी दैना का झाली, या समाजाचा इतिहास काय, समाजातील वीरपुरुष कोणते? याविषयीही तो बोलत होता... बोलता बोलता पारध्यांमधील अनेक परंपरांवर चर्चा झाली. अगदी बाळंतपणावरही चर्चा झाली... भटक्‍यांमधील काही जातींमध्ये महिला स्वतःचं बाळंतपण स्वतःच करून घेतात, असं मी ऐकलं होतं... पारध्यांमधील जे लोक शिकले, सवरले आणि सावरले त्यांनी आता बऱ्यापैकी या प्रथा, परंपरा सोडून दिल्या आहेत... स्थिर झाल्यानं पारध्यांच्या जीवनात अनेक बदल घडत आहेत. पूर्वी त्यांची नावं पिस्तुल्या, बंदुक्‍या, पोलिशा, सिगारेट्या, बेड्या अशी असायची... आता ती भास्कर, नामदेवापर्यंत पोचली; पण ज्यांच्या वाट्याला अजून फिरस्तीच आहे ते अजूनही अमानवी वाटाव्यात अशा अनेक प्रथा-परंपरांचं ओझं घेऊनच फिरत आहेत... बदल होतोय हळूहळू; पण त्याची गती नाही वाढत अद्याप...

भास्कर खूप बोलला... त्याला अजून लिहायचंय, बोलायचंय... तो निघून गेला; पण मी मात्र रात्रभर हैराण होतो... हा समाज उजेडात कधी येणार, कोण आणणार? हा प्रश्‍न छळत होता... दुसऱ्या दिवशी मी भास्करच्या भावाला फोन केला... नामदेवला... अजून काही गोष्टी आणखी स्पष्ट करून घ्यायच्या होत्या... विशेषतः बाळंतपणाच्या... म्हणजे एका अर्थानं माणसाच्या जन्माच्याच...

नामदेव म्हणाला, ""साहेब, सांगण्यासारखं लई आहे. एकदा या तुम्ही आमच्याकडं... भरपूर बोलतो. येताना सुरेश खोपडेसाहेबांना घेऊन या... कार्यक्रम ठेवू या... निमंत्रणपत्रिका काढू या वगैरे वगैरे...'' नामदेवला मूळ विषयावर आणलं तसं तो म्हणाला, ""तुम्ही म्हणताय ते खरंय, पण आता आमच्याकडंही लई बदल व्हायला लागले आहेत... आमची बाई स्वतःचं बाळंतपण स्वतः नव्हती करत; पण नवरा तिच्या पोटावर पाय देऊन बाळंत करत असे. शहरात आता असं कोणी करत नाही; पण पालाबरोबर फिरणारे काही जण अजून करतात... आता यात जोखीमही असतेच. कधी-कधी बाई दगावते... तसं घडलं तर तिचा शेवटचा विधी नवऱ्यालाच करावा लागतो. बाकी कोणी जात नाहीत. बाईचा भाऊ अविवाहित असेल तरच डेडबॉडीला हात लावू शकतो; पण इतर कोणी अंत्यविधीच्या कार्यात जाऊ शकत नाहीत. जुन्या वळणाच्या लोकांत अजूनही ही पद्धत आहे. खरं तर आमच्या समाजात बायांचे लई हाल होत्यात... अजूनही अनेक जणींची आठ-दहा बाळंतपणं होतात... लई त्रासाचा काळ असतो ह्यो... पावशेर शेंगदाणं आणि पावशेर गुळावरच तिला या काळात गुजराण करावी लागते...''

नामदेवला खूप बोलावंसं वाटत होतं, पण फोनवर किती बोलणार? त्यातूनही तो भरभर सांगू लागला, ""साहेब आमच्याकडं लग्न झालेल्या बाईच्या हातचं स्वयंपाक फक्त तिचा नवरा आणि तिची पोरंच खातात. सासू-सासरे, दीर आदी नातेवाईक तो खात नाहीत. आपण भ्रष्ट झालो, असं त्यांना वाटतं. चुकून विवाहित बाई पाणी किंवा पाण्याचा पाइप जरी ओलांडून गेली तरी ते पाणी बाटतं... इतर लोक ते पिणार नाहीत. एवढंच काय, लगीन झालेल्या बाईचे कपडे स्वतंत्रपणे ठेवावे लागतात. आमच्या पारध्यांच्या वस्तीत बायकांच्या साड्या घरावर वाळताना कधीच दिसणार नाहीत. त्या स्वतंत्रपणे धुतल्या जातात. स्वतंत्रपणे वाळवल्या जातात आणि स्वतंत्रपणेच गाठोड्यात ठेवल्या जातात. एवढंच काय, बाईची न्हानीबी अलग... घराबाहेर, पालाबाहेर अलगच असते. देवाधर्माच्या काळात तर तिची सावलीही देवावर पडणार नाही... पुरुषच देवासाठीचा नैवेद्य करतात. भांडी धुण्यापासून सारी कामं तेच करतात... बाईचा हात कुठंच लागू दिला जात नाही... आता हे सारं कधी आणि कसं सुरू झालं ठाऊक नाही; पण काही ठिकाणी ते टिकून आहे अजून... हे सारं संपावं म्हणून आम्ही खूप प्रयत्न करतोय.. म्हणावं तेवढं यश येत नाही अजून...''

नामदेव म्हणाला, ""एकदा तर लई डेंजर अनुभव आला. उरुळी कांचनपासून काही अंतरावर भरपावसात एका बाईला बाळंतपणासाठी बाहेर ठेवलं होतं... वरनं धो-धो पाऊस पडतोय... बाई रडतेय, विव्हळतेय... पण सुटका काय होत नव्हती... नवऱ्यानं केली सुटका पाय ठेवून; पण बाई दगावली... बाईला लई दांडगा त्रास सहन करायला लागतोय अजून...''

नामदेवचं ऐकून अंगावर शहारे येत होते... बरंच कायबाय आठवत होतं... काही जातींमध्ये तर स्वतःचं बाळंतपण स्वतःच करून घेण्याची जबाबदारी महिलांवर... बाळंतपणाच्या काळात तिच्यासाठी स्वतंत्र पाल (झोपडं) ठोकलं जातं... बाहेरून अन्न दिलं जातं... बाई आत धडपडते... वेदनांनी व्याकूळ होते... सुटते. बाळंतपणातून आणि स्वतःच्या लेकराची नाळ स्वतःच तोडून बाहेर पडते पालाबाहेर...

काळ बदलतोय म्हणतात... विज्ञानाचा, ज्ञानाचा समाज येतोय म्हणतात... खोटं नाहीय हे... प्रश्‍न आहे तो या साऱ्या ज्ञान-विज्ञानाचा उजेड यांच्यापर्यंत कधी पोचणार? गेल्या काही वर्षांत लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, यल्लप्पा वैदू, बाळकृष्ण रेणके, जी. जी. भोसले आणि हे नामदेव व भास्कर बंधू आपापल्या परीनं लढताहेत... काही सुधारणा घडवताहेत; पण गती वाढवायची असंल तर स्थिर समाजातल्या लोकांनीही पुढं यायला हवं. अनिष्ट प्रथा-परंपरा, अंधश्रद्धा माणसाच्या चेहऱ्यावर गच्च चिकटल्या, की त्याचं माणूसपणच हरवून जातं. दोन समाज जन्माला येतात. एक चेहरा असलेला समाज आणि दुसरा चेहरा नसलेला समाज... व्यवस्था दुरुस्त केली नाही, जुने जाऊ द्या मरणालागुनी... असं पुनःपुन्हा म्हटलं नाही तर चेहरा आणि बिनचेहरा यातील अंतर वाढतं... ते टाळण्यासाठी चेहऱ्यावाल्यांनी या बिनचेहऱ्यावाल्यांकडं जबाबदारीच्या, कर्तव्याच्या भावनेतून पाहायला शिकायला हवं... आपण एकटे काय करणार, हा प्रश्‍न उपस्थित करून काय उपयोग?... भास्करनं आपल्या पुस्तकात त्याला जसं जमलं तसं लिहिलंय... निदान त्यातल्या भावना, त्यातला विद्रोह आणि आम्हाला माणूस म्हणा, यासाठीची धडपड तरी समजून घ्यायला हवी... आपण स्थिर समाजासाठी अनेक मोहिमा राबवतो, जसं की निरक्षरता निर्मूलन, पोलिओ निर्मूलन, हुंडा निर्मूलन, हाताला चिकटलेल्या घाणीचं निर्मूलन इत्यादी इत्यादी... त्या राबवू नयेत असं माझं मत नाहीय. प्रश्‍न आहे तो व्यवस्थेनं ज्यांचा चेहरा, जगणं आणि मरणंच हिरावून घेतलं. ओरबाडून घेतलं, अशांसाठी चेहरावाटप मोहीम कधी सुरू होणार? हात स्वच्छ करत आहोत आपण, पण मनं स्वच्छ कधी करणार?...